ब्रह्मपुरीत AI च्या मदतीने उत्पन्नाच्या दाखल्याची बनावटगिरी; गुन्हा दाखल
– ग्रामपंचायत संगणक ऑपरेटरवर गुन्हा दाखल
The गडविश्व
ब्रह्मपुरी, दि. ३० : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय दस्तऐवज बनावट तयार करण्याचा प्रकार ब्रह्मपुरी तालुक्यातील भुज येथे समोर आला आहे. ग्राम महसूल अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी आणि शासकीय शिक्का वापरून उत्पन्नाचा दाखला तयार केल्याचा आरोप भुज ग्रामपंचायतीतील संगणक ऑपरेटरवर करण्यात आला आहे. या प्रकरणी नामदेव वसंता झोडे (३५) याच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १.०५ वाजता भुज ग्रामपंचायतीतील संगणकावरून ज्ञानेश्वर मुखरू मरस्के यांच्या नावाने उत्पन्नाचा दाखला तयार करण्यात आला. ऑनलाइन पडताळणीसाठी हा दाखला ब्रह्मपुरी तहसील कार्यालयातील सेतू केंद्राकडे पाठविण्यात आला. मात्र, पडताळणी प्रक्रियेदरम्यान दस्तऐवजातील सही आणि शिक्क्याबाबत संशय निर्माण झाला. त्यामुळे या दाखल्याची चौकशी करण्यात आली.
चौकशीत ग्राम महसूल अधिकारी मधुकर मनीराम मानकर यांच्या नावाने मिळतीजुळती बनावट स्वाक्षरी करण्यात आल्याचे, तसेच बनावट शासकीय शिक्का वापरल्याचे उघड झाले. याशिवाय, संबंधित अधिकाऱ्याऐवजी अन्य ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव दाखल्यावर नमूद करण्यात आले होते. हा संपूर्ण दस्तऐवज AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकारानंतर मधुकर मानकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी तहसीलदारांकडे लेखी तक्रार सादर केली. त्यानुसार नायब तहसीलदारांना चौकशीचे निर्देश देण्यात आले. १५ ऑक्टोबर रोजी भुज ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. या चौकशीत संगणक ऑपरेटर नामदेव झोडे याचा या गैरप्रकारातील सहभाग निष्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मानकर यांनी २७ ऑक्टोबर रोजी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३६(२), ३३६(३) आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक रेखालाल गौतम या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
AI तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय अधिकाऱ्यांची सही आणि शिक्क्याची नक्कल करण्यापर्यंत मजल गेल्याने शासकीय दस्तऐवजांच्या पडताळणी प्रक्रियेबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
#thegdv #thegadvishva #Brahmapuri #Gadchiroli #FakeIncomeCertificate #AITechnology #DocumentForgery #GovernmentDocuments #FakeSignature #FakeStamp #GramPanchayat #RevenueDepartment #MaharashtraPolice #CrimeNews #CyberCrime #MarathiNews #TheGadvishva













