कुरखेडा : तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गडचिरोली पोलीस दलातील दोघांवर गुन्हा

5

कुरखेडा : तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गडचिरोली पोलीस दलातील दोघांवर गुन्हा
– ५२ दिवसांनी कारवाई; सुसाईड नोट आणि आईच्या तक्रारीनंतर दोघांनाही अटक
The गडविश्व
ता.प्र/कुरखेडा, दि. ३० : पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून गडचिरोलीत आलेल्या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गडचिरोली पोलीस दलातील एका पुरुष आणि एका महिला कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसंबंधातून लग्नाचे आश्वासन देऊन नंतर माघार घेणे आणि फोनवरून अपमानास्पद बोलणे, अशा प्रकारांमुळे तरुणी मानसिक तणावात गेल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येच्या घटनेनंतर तब्बल ५२ दिवसांनी २९ ऑक्टोबर रोजी कुरखेडा पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणातील दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

कुरखेडा तालुक्यातील तरुणी ऑगस्ट २०२५ पासून पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी गडचिरोलीतील लांझेडा येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. याचदरम्यान तिची गडचिरोली पोलीस दलातील शिवकुमार छोटलाल करसायल (२८) याच्याशी ओळख झाली. तो सिटीसी किटाळीच्या ड्रोन विभागात कार्यरत आहे. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर त्याने तरुणीशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पुढे त्याने लग्नाबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले असून, गडचिरोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अश्विनी राऊत (२६) या महिला कर्मचाऱ्याचेही नाव समोर आले आहे. त्यांनी फोनवरून आपल्या मुलीशी अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचा आरोप तरुणीच्या आईने तक्रारीत केला आहे. या दोन्ही घटनांमुळे मुलगी मानसिक तणावाखाली होती आणि त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा आईने केला आहे.

आत्महत्येनंतर पोलिसांना तरुणीने लिहिलेली सुसाईड नोटही मिळाली होती. आईने दिलेली तक्रार आणि सुसाईड नोटमधील बाबींच्या आधारे कुरखेडा पोलिसांनी २९ ऑक्टोबर रोजी शिवकुमार करसायल आणि अश्विनी राऊत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Kurkheda #CrimeNews #MaharashtraPolice #PoliceNews #SuicideCase #CrimeInvestigation #GadchiroliNews #MaharashtraNews

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here