कापूस वेचताना अचानक दिसले वाघाचे बछडे; मासळ-मानेमोहाळी परिसरात भीतीचे सावट

9

कापूस वेचताना अचानक दिसले वाघाचे बछडे; मासळ-मानेमोहाळी परिसरात भीतीचे सावट
– शेतशिवारात वाघिणीसह तीन बछड्यांचा संचार; शेतीकामांसाठी जाणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
The गडविश्व
प्र/मासळ बु., दि. ३० : शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या मजुरांना अचानक वाघाच्या बछड्यांचे दर्शन झाल्याने मासळ-मानेमोहाळी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगत असलेल्या या भागात वाघिणीसह तीन बछडे फिरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतात जाणाऱ्या शेतकरी आणि मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा वावर असण्याची शक्यता असतानाही शेतीची कामे थांबवणे शेतकऱ्यांना शक्य नाही. सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू असल्याने महिला मजुरांची शेतांमध्ये नियमित ये-जा सुरू आहे. अशाच मासळ-मानेमोहाळी मार्गावरीला एका शेतात काम सुरू असताना एका महिला मजुराला अचानक वाघाचा बछडा दिसला. अनपेक्षितपणे समोर आलेल्या बछड्यामुळे ती घाबरली आणि तिने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून आसपासच्या शेतांतील लोक जमा झाले. त्यानंतर परिसरात वाघिणीसह तीन बछडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेने शेतमजुरांमध्ये भीती निर्माण झाली असून, कापूस वेचणीसारखी रोजची कामे करतानाही जीव धोक्यात घालावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. वाघिणीसोबत बछडे असल्याने तिच्या संभाव्य हालचालींबाबतही नागरिकांमध्ये चिंता आहे. घटनेदरम्यान कोणालाही इजा झाली नसली, तरी भविष्यात अशा प्रसंगाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.

शेतीकामे करायची कशी? शेतकऱ्यांचा सवाल

एकीकडे शेतीचा हंगाम आणि दुसरीकडे शेतशिवारातील वाघांचा वावर, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. केवळ सूचना देण्याऐवजी वनविभागाने प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन या परिसरात गस्त वाढवावी. वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासोबतच शेतकरी व महिला मजुरांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Chimur #Masal #ManeMohali #TadobaTigerReserve #TigerMovement #TigerCubs #Tigress #WildlifeNews #HumanWildlifeConflict #ChandrapurNews #MaharashtraNews #ForestDepartment #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here