धक्कादायक : रेल्वेचा भीषण अपघात, ५० ठार तर अनेकजण जखमी

2338

– तीन रेल्वेचा अपघात आणि होत्याच नव्हतं
The गडविश्व
मुंबई, २ जून : ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसच्या झालेल्या भीषण अपघातात ५० जणांचा मृत्यू तर ३५० पेक्षा अधिकजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की कोरोमंडल एक्स्प्रेस समोरून येणाऱ्या मालगाडीला धडकली, यानंतर ट्रेनचे डबे दुसऱ्या ट्रॅकवर गेले, दुसऱ्या ट्रॅकवरूनही ट्रेन येत होती, त्यामुळे दोन नाही तर तीन ट्रेनचा अपघात झाला आहे.

 

शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिली, यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे दुसऱ्या ट्रॅकवर गेले असता त्याच दरम्यान काहीच वेळात यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस दुसऱ्या ट्रॅकवरून येत होती. या ट्रेनने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या ट्रॅकवर आलेल्या डब्यांना धडक दिल्याने यशवंतपूर-हावडा ट्रेनचे तीन-चार डबे घसरले, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

 

जखमींना सोरो सीएचसी, गोपालपुर सीएचसी आणि खांटापाडा पीएचसीमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस (12841)पश्चिम बंगालच्या शालिमार स्टेशनहून चेन्नईसाठी निघाली होती. बालासोरला संध्याकाळी ६.३० वाजता ट्रेन पोहोचली होती. उद्या दुपारी ४.५० मिनिटांनी ट्रेन चेन्नईला पोहोचणार होती. ट्रेनच्या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here