रामगड ग्रामपंचायतीत ६३.९४ लाखांचा घोटाळा
– ग्रामसेवक- विस्तार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व निलंबनाची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २४ : तालुक्यातील रामगड ग्रामपंचायतीत ६३ लाख ९४ हजार ५१७ रुपयांच्या विकास निधीचा संगनमताने गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून, संबंधित ग्रामसेवक व विस्तार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिक नितीन तुळशिराम केरामी यांनी कुरखेडा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत हा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत सचिव कुमारी अनुसया झाडू तुमळाम व विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर भोगे यांनी २०२१ ते २०२६ या कालावधीत १५व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीचा अपहार केला आहे.
केरामी यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत निधी व खर्चाबाबत माहिती मागविली असता ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली किंवा चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे संशय अधिक बळावल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, वार्षिक कृती आराखडे (GPDP) ग्रामसभा, महिला ग्रामसभा, वार्डसभा, बालसभा तसेच वंचित घटकांच्या सभांची मंजुरी न घेता तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. ग्रामसभेची इतिवृत्ते व कामांचे छायाचित्रे अपलोड न करता काही ठिकाणी चुकीचे फोटो अपलोड करून जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. PESA कायद्यांतर्गत आवश्यक असलेली प्रक्रिया, प्रसिद्धी व खातेदारांना जमा-खर्चाचा तपशील न देणे यामुळे संपूर्ण निधी खर्च बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारदारांनी शासन निर्णय (१२ जून २०१३), महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चा आधार घेत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, नाजूकराव दखणे हे देखील पत्रकार परिषदेस उपस्थित होते. दोघांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय (गडचिरोली कक्ष), गट विकास अधिकारी व तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केल्याची माहिती दिली.
याबाबत पंचायत समिती कुरखेडाचे गटविकास अधिकारी धीरज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, “सदर प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
प्रकरणाची चौकशी लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














