सकस आहार व नियमित उपचारांनी टीबीवर मात : मसेलीत जनजागृतीची मोहीम

37

सकस आहार व नियमित उपचारांनी टीबीवर मात : मसेलीत जनजागृतीची मोहीम
The गडविश्व
ता.प्र /कोरची, दि. २४ : क्षयरोगावर प्रभावी मात करण्यासाठी नियमित उपचारांसोबत सकस आहार अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक प्रमोद सातपुते यांनी केले. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, कोरची यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मसेली येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली. सरपंच सुनील सयाम व उपसरपंच विरेंद्र जांभूळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ केला. “टीबी हरेल, देश जिंकेल” अशा घोषणांनी मसेली गाव दुमदुमले. नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
यानंतर आश्रम शाळा मसेली येथे विद्यार्थ्यांना क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. छत्रपती विद्यालय, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापिका नंदागळवी, वरखडे सर, मेश्राम सर, डॉ. नंदागवळी, समुदाय आरोग्य अधिकारी रंगारी, आरोग्य सेवक चलाख तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता.
दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला, संध्याकाळी ताप, वजन घटणे, छातीत दुखणे, थुंकीत रक्त येणे व मानेवर गाठी ही क्षयरोगाची प्रमुख लक्षणे असल्याची माहिती देण्यात आली. हा संसर्गजन्य आजार असून हवेच्या माध्यमातून पसरतो, त्यामुळे खोकताना रुमाल किंवा मास्कचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.
भारत सरकारकडून क्षयरोगाची तपासणी व उपचार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांना दरमहा १००० रुपयांची पोषण आहारासाठी मदत दिली जाते, असेही यावेळी सांगण्यात आले.
‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत ६० वर्षांवरील नागरिक, तंबाखू व मद्यसेवन करणारे, टीबी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, मधुमेह व उच्च रक्तदाब असलेले रुग्ण, एकत्र राहणारे विद्यार्थी तसेच कुपोषित बालकांची तपासणी करण्यात येणार आहे. कोरची येथे ट्रू-नॅट व एक्स-रे यंत्रणा उपलब्ध असल्याने जलद निदान व त्वरित उपचार शक्य होत आहेत.
दरम्यान, नांगपूर, भीमपूर, नांदली, कुकडेल व मर्केकसा या उपकेंद्रांवरही जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरोग रुग्णांना फूड बास्केटचे वाटप केले. समाजातील विविध घटकांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढे येऊन या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here