समाजपरिवर्तनाची दखल : गडचिरोलीतील ५ जणांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजपरिवर्तन घडवून आणणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पाच कार्यकर्त्यांची ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ासाठी निवड करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दि. २५ व २६ मार्च २०२६ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून मनोहर माधवराव हेपट (गडचिरोली), केशव रामधन चव्हाण, सूर्यप्रकाश सरस्वती गजानन गभने (देसाईगंज), विजय श्रीरंग शेंडे तसेच तुळशीराम तुलाराम उंदीरवाडे यांची निवड करण्यात आली आहे. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्स्थापना या क्षेत्रांत प्रभावी कार्य करून या सर्वांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
सन १९९८-९९ पासून सुरू असलेल्या या पुरस्कार योजनेअंतर्गत व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. सन २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीतील पुरस्कारांसाठी राज्यस्तरीय निवड समितीच्या शिफारशीवरून या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारात सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ तसेच आर्थिक पारितोषिकाचा समावेश असून, व्यसनमुक्ती चळवळीला यामुळे नवे बळ मिळणार आहे. दरम्यान, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांनी सर्व निवड झालेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती अधिक बळकट होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.














