आरमोरी शहरातील नागरिकांना नियमित शुद्ध पिण्यायोग्य पाणीपुरवठा करा : मिलिंद खोब्रागडे

210

– नागरिकांना मिळतो चार-पाच दिवसानंतर एकदा नळाचे पाणी
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २८ फेब्रुवारी : शहरात पाण्याची टंचाई उदभवली असून येथील नागरिकांना नागरपालिकेमार्फत चार-पाच दिवसानंतर एकदा नळाचे पाणी मिळत आहे. शहरात नियमित शूद्ध पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्यात यावा तसे न झाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केला आहे.
आरमोरी नगरपालिकेला तब्बल चार वर्षे झाली व पुन्हा नुकत्याच सभापती निवडणुका पार पडल्या. बहुमत असल्याने सभापती म्हणून भाजपचे सर्व मंडळ स्थापन झाला, पुन्हा त्याच लोकांना त्यांची जुनी खाती मिळाली. गेल्या चार वर्षापासून सुरू असणारा नगरपालिकेचा ससे मिरा पुन्हा त्याच खांद्यावर ठेवला गेला, पुढील वाटचालीच्या अनेक स्नेही लोकांनी शुभेच्छा दिल्या परंतु तेच सभापती आणि तीच पदे मिळाल्याने जनतेच्या कामाला आणि नगरपालिकेच्या गतीला याचा फायदा होणार नाही असे सूरही उठू लागले आहेत. इकडे सभापती निवडणूक पार पडली स्वागतांचा कार्यक्रम पार पडला आणि तिकडे दुसऱ्या दिवसापासून आरमोरी शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाले. गेल्या चार-पाच दिवसापासून नळाला पिण्याचे पाणीच नाही, शहरातील जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करायला लागली आणि जनतेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला की पूर्णपणे एक हाती सत्ता आली की एका वर्षात नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणू आणि प्रत्येकाच्या घरी नळ देऊ आणि नळाला जल देऊ असे आश्वासन दिल्या गेले परंतु जनतेनी मतदान करून निवडणूक जिंकवली सत्तेत बसविले आहे परंतु चार वर्षे पूर्ण झाले असतांना आद्यपही शहरातील जनता त्या नवीन नळ योजनेची आता चातक पक्षासारखी वाट पाहू लागली आहे परंतु अजूनही त्याचा काही पत्ताच लागत नाही. केंद्रात आणि राज्यात तसेच नगरपालिकेत सुद्धा एकच सत्ता असून सुद्धा पाण्याचा प्रश्न मार्गी लागताना दिसत नाही म्हणून सत्तेवर असलेली सरकार अपयशी ठरलेली असल्याचे दिसून येत आहे.
एकूणच या प्रकराबाबत काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी म्हटले आहे की, राज्यातील एकहाती सत्ता असून या जिल्ह्याचे पालकमंत्री या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री सुद्धा त्यांच्याकडेच आहेत परंतु ते जिल्ह्याकडे कधी फिरकत नाही, आमदार खासदार पळवा पळवी चे राजकारण करून फक्त सत्ता काबीज करण्यात व्यस्त आहेत, निवडणुकीला चार वर्षे लोटली आणि अवघा एक वर्ष निवडणुकीला बाकी असल्याने आता मात्र प्रश्न पडला आहे की कसेही करून या सत्रात नवीन पाणीपुरवठा मंजूर करून आणावीच लागेल आणि किमान भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात करावा लागेल. अन्यथा पुढील निवडणुकीत जनतेसमोर जाताना काय उत्तर देणार याची धडपड मात्र आता सुरू झाली आहे. नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्यावर ही किमान त्याची पूर्तता आणि प्रत्येकाच्या घरात नळाचे पाणी यायला एक दोन वर्षाचा कालावधी किंवा त्याहीपेक्षा जास्त विलंब लागू शकते असे मत व्यक्त केले आहे.
आरमोरी नगरात सध्या सुरू असलेला चार-पाच दिवसानंतर चा पाणीपुरवठा तोही दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी असल्याने नगरवासी यांच्या जीविकास धोका निर्माण झालेला आहे. नगरपरिषद चे पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकारी हे सुद्धा अणभिज्ञ असून उन्हाळा लागण्यापूर्वीच आता ज्या पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे असाच राहिला तर मात्र सुरू होणारा उन्हाळा आरमोरी शहरातील जनतेला पाण्यासाठी कठीणाईचा होऊ शकते. गावात पाणीपुरवठा बंद असताना आणि मोठ्या प्रमाणात कर वाढ झाल्याने निराश झालेल्या जनतेला सूचना देण्यासाठी घंटागाड्यांच्या माध्यमातून कर भरण्यासाठी मुनादी दिला जात आहे आणि घरोघरी जाऊन वसुली ही केल्या जात आहे त्यामुळे जनता निराश झालेली आहे. शहरातील लोकांना पावसाळा वगळता नेहमीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, महिन्यातून केवळ आठ ते दहा किंवा त्यापेक्षा कमी दिवस पाणीपुरवठा होतो. शहरात मागील अनेक वर्षापासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अतिदुर्गम भागात नसेल त्याहूनही अधिक बिकट पाणीटंचाईची समस्या आरमोरी शहरात आहे. शहरातील पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने अनेक भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत आणि म्हणून एकंदरीत अशा नगरपालिकेच्या कारभारामुळे आणि सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुकीत जनता नक्कीच धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. शहरात नियमित शूद्ध पिण्यायोग्य पाणीपुरवठा न झाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here