गडचिरोलीत ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा प्रभाव ; 14 आत्मसमर्पित माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया यशस्वी

42

गडचिरोलीत ‘प्रोजेक्ट संजीवनी’चा प्रभाव ; 14 आत्मसमर्पित माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया यशस्वी
– पोलीस दल व सर्च फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम • आतापर्यंत 50 जणांवर शस्त्रक्रिया • पुनर्वसनाला मिळतोय नवा आयाम
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : माओवादी चळवळ सोडून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या आत्मसमर्पित सदस्यांच्या पुनर्वसनासाठी गडचिरोली पोलीस दलाने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सर्च फाऊंडेशनच्या सहकार्याने चातगाव येथील दंतेश्वरी रुग्णालयात 14 आत्मसमर्पित माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
या उपक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील 13 व गोंदिया जिल्ह्यातील 1 अशा एकूण 14 जणांचा समावेश होता. दि. 21 मार्च रोजी शस्त्रक्रिया पार पडून 24 मार्च रोजी सर्वांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
माओवादी चळवळीत कार्यरत असताना सामान्य कौटुंबिक जीवनापासून वंचित राहिलेल्या आत्मसमर्पितांना स्थिर, सुरक्षित व आनंदी जीवन जगता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्व आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर सुरक्षित वातावरणात शस्त्रक्रिया करण्यात आली.
या शस्त्रक्रिया पद्मश्री डॉ. अभय बंग, पद्मश्री डॉ. राणी बंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लीलावती रुग्णालय, मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या पूर्ण केल्या.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून आतापर्यंत एकूण 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया करण्यात आली असून, यापैकी 36 जणांपैकी 13 जणांना अपत्यप्राप्ती झाली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
यासोबतच आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनासाठी गृहप्रकल्प, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, ओळखपत्रे, स्वयंरोजगार, महिला बचत गट, वैद्यकीय मदत, समुपदेशन व सामूहिक विवाह सोहळे अशा विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडमध्ये 72 जणांना प्रशिक्षण व रोजगाराची संधी देण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रोजेक्ट संजीवनी’ राबविला जात असून, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज यांच्या नेतृत्वात आत्मसमर्पण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हा उपक्रम यशस्वी करत आहेत.
एकूणच, या उपक्रमामुळे आत्मसमर्पित माओवाद्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत असून, त्यांना मुख्य प्रवाहात सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला होत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here