रांगीत BSNL सेवा ठप्प ; १५ दिवसांपासून ग्राहक त्रस्त
– आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि.२६ : धानोरा तालुक्यातील रांगी व परिसरात भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ची सेवा पूर्णपणे कोलमडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गावातील उभारलेला बीएसएनएलचा मोबाईल टॉवर सध्या केवळ “पांढरा हत्ती” ठरत असून मागील १५ दिवसांपासून नेटवर्क सेवा अत्यंत ढेपाळलेल्या अवस्थेत आहे.
गावात उभारलेल्या टॉवरमुळे अनेक नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने बीएसएनएलची सिमकार्ड खरेदी केली होती. मात्र प्रत्यक्षात नेटवर्क सतत गायब होत असल्याने मोबाईल सेवा जवळपास निकामी ठरत आहे. इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद असून दैनंदिन कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले टॉवर आज केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे उभे असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. रांगीसह मोहली परिसरातील सेवा पूर्णतः ठप्प झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दरम्यान, वारंवार तक्रारी करूनही बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “सेवा मिळत नसेल, तर खर्च केलेल्या जनतेच्या पैशाचे काय?” असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन बीएसएनएल सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #bsnl














