धानोरा : विद्यानगरात तीव्र पाणीटंचाई , सौर जलयोजना ठप्प
– मडका फोड आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २५ : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील विद्यानगर वार्डात सौर उर्जेवर आधारित नळपाणी योजना पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांना, विशेषतः महिलांना, तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी २५ मार्च २०२६ रोजी महिलांनी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना’ अंतर्गत २०२३-२४ मध्ये सौर उर्जेवर चालणारी पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र, योजना सुरू झाल्यानंतर केवळ पहिल्याच दिवशी नळांना पाणीपुरवठा झाला आणि त्यानंतर योजना पूर्णतः निष्क्रिय झाली. टाकीत पाणी भरल्याचा आवाज येत असला तरी नळांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात अनेक वेळा संबंधित कर्मचाऱ्यांना कळवूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. शासनाच्या निधीतून उभारलेली योजना निष्क्रिय अवस्थेत पडून असून नागरिकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेकडे नगरपंचायतीचे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. परिणामी महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असून टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वार्डात प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर समस्या सात दिवसांत मार्गी लावून सौर जलटाकीची पाहणी करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर मडका फोड आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अर्चना करमनकर, यशोधरा हुमने, सीमा हलामी, सुनंदा हलामी, कल्याणी घोडमारे, रूपाली कोल्हटकर, रश्मी बन्सोड आदी महिलांसह नागरिकांनी दिला आहे.
“प्रभाग क्रमांक १ मधील सौर जलयोजनेचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
— ललित बरछा, उपाध्यक्ष, नगरपंचायत धानोरा














