देसाईगंज : मृत्यूच्या दारातून मातेला परत आणले, परिचारिकेच्या तत्परतेने टळला माता मृत्यू
– वडसा ग्रामीण रुग्णालयातील कौतुकास्पद कामगिरी; जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याकडून विशेष गौरव
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : वडसा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर गंभीर अवस्थेत गेलेल्या एका मातेचे प्राण परिचारिकेच्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे वाचल्याची प्रेरणादायी घटना घडली आहे. हृदयक्रिया बंद पडलेल्या रुग्णाला वेळेत सीपीआर देऊन परिचारिका कविता यांनी मृत्यूच्या दारातून परत आणले. त्यांच्या या धाडसी कार्यामुळे संभाव्य माता मृत्यू टळला असून जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.
वडसा ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी सिझेरियन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. हीना यांची नियुक्ती झाल्यानंतर येथे सिझेरियन सेवा सुरू करण्यात आली. सध्या दरमहा पाच ते दहा सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडत असून परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा लाभ होत आहे.
काही दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी संबंधित महिलेला अचानक तीव्र झटके आले. काही क्षणांतच तिचा श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके थांबले. परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असताना कर्तव्यावर असलेल्या परिचारिका कविता यांनी क्षणाचाही विलंब न करता आपत्कालीन उपचार सुरू केले.
कार्डियाक रुग्णालयात काम करण्याचा पूर्वानुभव आणि विशेष प्रशिक्षणाच्या बळावर त्यांनी तातडीने रुग्णाला सीपीआर देण्यास सुरुवात केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे रुग्णाची हृदयक्रिया पुन्हा सुरू झाली आणि तिची प्रकृती स्थिर करण्यात यश आले. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिसार आणि डॉ. हीना यांच्या देखरेखीखाली पुढील उपचारासाठी संबंधित महिलेला जिल्हा रुग्णालय, गडचिरोली येथे सुरक्षितपणे हलविण्यात आले.
सध्या मातेची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी परिचारिका कविता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिसार तसेच डॉ. हीना यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील प्रशिक्षित आणि समर्पित कर्मचाऱ्यांमुळेच अशा गंभीर प्रसंगी रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होते. परिचारिका कविता यांनी दाखविलेले धैर्य, कौशल्य आणि प्रसंगावधान हे इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य सेवेतील तत्परता आणि गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून शासकीय आरोग्य यंत्रणेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.














