धानोरात अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा ; दारूसाठा जप्त, गुन्हा दाखल
– पोलिस व मुक्तीपथच्या संयुक्त कारवाईने शहरात खळबळ
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. १३ : धानोरा शहरातील अवैध दारूविक्रीविरोधात पोलिस विभाग व मुक्तीपथ पथकाने संयुक्त कारवाई करत एका दारूविक्रेत्याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत देशी व विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धानोरा शहरात अवैधरित्या दारूविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस व मुक्तीपथच्या पथकाने संबंधित संशयिताच्या घरावर धाड टाकली. झडतीदरम्यान सुमारे ६ हजार ७५० रुपयांचा देशी व विदेशी मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून संबंधित दारूविक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली.
या कारवाईमुळे शहरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांकडून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले.
सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये मुक्तीपथ तालुका संघटक राहुल महाकुलकर, पोलीस हवालदार भजनराव गावडे, पोलीस शिपाई प्रवीण राऊत, विक्रांत मोहुर्ले, सागर लंबूवार, रुपेश शेडमाके तसेच मुक्तीपथच्या सहकारी मयुरी चिचघरे व संगीता तळमळकर यांनी सहभाग घेतला.














