– २९ सप्टेंबर ला केले होते अपहरण, प्रेस नोट मधून नक्षल्यांनि दिली होती माहिती
The गडविश्व
बीजापूर, ७ ऑक्टोबर : जिल्ह्यात नक्षल्यांनी बस्तर फायटरचे शिपाई शंकर कुडियम यांचे २९ सप्टेंबर ला अपहरण केले होते. तब्बल सात दिवसांनी नक्षल्यांनी त्यांच्या तावडीतून जवानाची सुटका केली आहे. नक्षल्यांनी अबुझमाडच्या जंगलात सार्वजनिक न्यायालयाचे आयोजन केले होते. यावेळी जवानाला आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळाच्या ताब्यात देण्यात आल्याचे कळते. दरम्यान शिष्टमंडळातील सदस्य शिपायासह बीजापूर जिल्हा मुख्यालयात परतले आहेत.२९ सप्टेंबर रोजी नक्षल्यांच्या पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) ने उसपरी गावातून शंकर कुडियामचे अपहरण केले होते. दरम्यान नक्षल्यांनी मानर डिव्हीजन कमिटीच्या सचिव अनिता यांनी प्रेस नोटसोबत जवानाचा फोटोही जारी केला होता. यावेळी जवानाच्या कुटुंबातील व्यक्तींनी सुटका करण्याचे आवाहन नक्षल्यांकडे केले होते. अखेर तब्बल ७ दिवसांनी नक्षल्यांनी बस्तर फायटरचे जवान शंकर कुडियम यांची सुटका केली असून त्यापूर्वी नक्षल्यांनी सार्वजनिक न्यायालयाचे आयोजन केले होते. त्यात ८ दिवसांपासून नक्षल्यांच्या ताब्यात असलेला शंकर सांगतो की, नक्षल्यांचा संशय होता की तो आपली गुप्त माहिती पोलिसांना देत होता. त्यामुळे जनता न्यायालय स्थापन करून नक्षल्यांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर त्याचे कुटुंबीय आणि समाजातील लोकांचे म्हणणे ऐकून त्याला सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. नक्षल्यांनी शंकर कुडियाम याला कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना सुखरूप बीजापूर जिल्हा मुख्यालयात नेले.