जंगलात मशरूम वेचताना आढळला IED; ग्रामीणांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

6

जंगलात मशरूम वेचताना आढळला IED; ग्रामीणांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
The गडविश्व
बीजापूर, दि. ०५ : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील मद्देड़ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदेपारा आणि पेगड़ापल्ली गावांजवळ जंगलात मशरूम वेचण्यासाठी गेलेल्या ग्रामीणांना जमिनीवर बिछवलेली संशयास्पद वायर दिसून आली. संशय आल्याने त्यांनी वायरला हात न लावता तातडीने पोलिसांना माहिती दिली. ग्रामीणांच्या या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
माहिती मिळताच मद्देड़ पोलीस आणि CRPFचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून तो सुरक्षित केल्यानंतर BDS पथकाला पाचारण करण्यात आले. तपासणीदरम्यान संशयास्पद वायरला जोडलेला प्रेशर IED आढळून आला. BDS पथकाने सुरक्षा मानकांचे पालन करत IED काळजीपूर्वक बाहेर काढला आणि निर्धारित प्रक्रियेनुसार घटनास्थळीच निष्क्रिय केला.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सुरक्षा दलांना लक्ष्य करून हानी पोहोचविण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी हा IED पेरला होता. मात्र, ग्रामीणांनी वेळीच संशयास्पद वायरची माहिती दिल्याने माओवाद्यांचा संभाव्य घातपाताचा डाव उधळला गेला.
या कारवाईत मद्देड़ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी, CRPF चे सहायक कमांडंट यांच्यासह BDS पथकातील जवान सहभागी झाले.
पोलिसांनी ग्रामीणांना आवाहन केले आहे की, जंगल, शेत, पायवाट किंवा रस्त्याच्या कडेला संशयास्पद वायर, खड्डा, टिफिन, कंटेनर किंवा कोणतीही बेवारस वस्तू आढळल्यास तिला हात लावू नये तसेच तिच्या जवळ जाऊ नये. अशा वस्तूची माहिती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सुरक्षा छावणीत द्यावी.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #cgnews #bijapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here