ग्रामसभेने जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी पोलिसांचा दबाव? ; कारवाईची तीव्र मागणी

46

ग्रामसभेने जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी पोलिसांचा दबाव? ; कारवाईची तीव्र मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : सामूहिक वनहक्क पट्ट्याच्या जमिनीत अतिक्रमण प्रकरणी ग्रामसभेने ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर सोडवून देण्यासाठी गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्याकडून दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप दर्शनी चक ग्रामसभेने केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामसभेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २७ जानेवारी रोजी दर्शनी चक परिसरात सामूहिक वनहक्काच्या जागेत अतिक्रमण करताना ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमणधारकास पकडून त्याच्याकडील ट्रॅक्टर ताब्यात घेतला. याबाबत प्रशासनाकडे कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात आला, मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याने ग्रामसभेने जंगलाच्या नुकसानीपोटी संबंधित अतिक्रमणधारकाकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला.
दरम्यान, या प्रकरणात जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या सदस्य सचिव तथा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित ट्रॅक्टर जप्त करण्याची कारवाई पोलिसांकडून अपेक्षित असताना, उलट ग्रामसभेलाच ट्रॅक्टर परत देण्याच्या सूचना देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, अन्यथा कारवाईचा इशाराही देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यानंतर ग्रामसभेने बैठक घेऊन अतिक्रमण करणाऱ्यावर एक लाख रुपयांचा दंड आकारण्याचा ठराव कायम ठेवत, १५ दिवसांत दंड न भरल्यास ट्रॅक्टरचा लिलाव करून नुकसानभरपाई वसूल करण्याचा निर्णय घेत नोटीस बजावली.
मात्र, अतिक्रमणधारकाने पोलिसांशी संगनमत करून ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांवर ट्रॅक्टर सोडण्यासाठी वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही ग्रामसभेने केला आहे. या प्रकारामुळे ग्रामसभेला प्राप्त सामूहिक वनहक्कांवर गदा येत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी व ग्रामसभेचे कायदेशीर हक्क अबाधित ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारीच्या प्रती राज्यपालांचे खासगी सचिव, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे सदस्य सचिव तथा अप्पर जिल्हाधिकारी आणि विभागीय वन अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here