धक्कादायक! गडचिरोलीतील एकलव्य आश्रम शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने घेतला गळफास
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : शहराजवळील एकलव्य आश्रम शाळेच्या वसतिगृहात अकरावीतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (दि.३०) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विद्यार्थी प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम (वय १७, रा. शांतिनगर, ता. चामोर्शी) हा शाळेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ६.२० वाजताच्या सुमारास तो वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सहविद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्याला तातडीने सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेच्या वेळी प्रिन्सचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. विशेष म्हणजे, प्रिन्स हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर शांतिनगरसह परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृतकाने दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या त्या एकामध्ये आत्महत्येचे वर्णन, माफीनामा सारखे मजकूर व दुसऱ्या चिठ्ठीचे वर्णन असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews














