माओवादाविरुद्ध शौर्याला सलाम! सी-60 जवानांना राज्य सरकारकडून विशेष ‘सी-60 पदक’
The गडविश्व
मुंबई, दि. ३१ : राज्यातील माओवादविरोधी लढ्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या सी-60 दलातील जवानांना राज्य शासनाकडून विशेष ‘सी-60 पदक’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. किमान तीन वर्षे सी-60 दलात सेवा बजावणाऱ्या जवानांना या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद पार पडली. या परिषदेस गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांनी माओवादाविरोधात निर्णायक यश संपादन केले असून राज्यातील माओवादी चळवळ आता नगण्य पातळीवर आली आहे. गडचिरोलीसारख्या भागात विकासाचे नवे चित्र उभे राहत असून लोकशाही अधिक बळकट होत आहे. मात्र, या चळवळीच्या पुनरुज्जीवनाला आळा घालणे हे पुढील मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले. या संघर्षात 244 पोलीस कर्मचारी शहीद झाले असून 609 नागरिकांनी प्राण गमावले आहेत.
पोलीस यंत्रणेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देत ‘एंड टू एंड’ डिजिटायझेशनची गरज त्यांनी व्यक्त केली. गुन्हे अन्वेषणापासून पुरावे संकलन आणि आरोपपत्र दाखल करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया शंभर टक्के डिजिटल केल्यास पुराव्यांची साखळी अधिक मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले. नवी मुंबईत राबविण्यात आलेल्या ब्लॉकचेन-आधारित एव्हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीमप्रमाणे प्रणाली राज्यभर लागू करण्याचे निर्देश देत पुढील सहा महिन्यांत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले.
दोषारोप सिद्ध होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी अपयशी ठरलेल्या प्रकरणांचे विश्लेषण करण्याचे निर्देश ‘सीआयडी’ला देण्यात आले. गंभीर गुन्ह्यांमध्ये कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी ठोस कार्यपद्धती आणि स्पष्ट रोडमॅप तयार करण्यावर भर देण्यात आला. तसेच पोलीस आणि सरकारी वकिलांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारा स्वतंत्र डॅशबोर्ड विकसित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
रस्ते अपघातांमध्ये घट करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना देत नागपूर व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रयोग यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. सायबर सुरक्षेबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी अधिक प्रभावी समन्वय साधण्याची गरज व्यक्त करत आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी जलद यंत्रणा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. वाढत्या रॅडिकलायझेशनकडे लक्ष वेधत त्यावर प्रोॲक्टिव्ह उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.
पोलीस दलातील अंतर्गत संवाद सुधारण्यावरही त्यांनी भर देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे आवाहन केले. “नेतृत्व म्हणजे लोकांना प्रेरणा देणे” असे सांगत अधिकाऱ्यांनी स्वतःच्या वर्तनातून आदर्श निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
राज्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी गुन्हेगारीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण कठोरपणे राबवण्याचे निर्देश देत ड्रग्सविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. बेकायदेशीर कृत्यांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फॉरेन्सिक प्रकरणांतील प्रलंबित कामकाज मोठ्या प्रमाणात कमी करण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाल्याचे नमूद करत, पुढील काळात सर्व प्रकरणे निकाली काढून फॉरेन्सिक कामकाज रिअल-टाइम पद्धतीने करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरमहा पुरस्कार योजना सुरू करण्याची सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच अपेक्षित कामगिरी न करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यावरही त्यांनी भर दिला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














