पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन रोशनी’ने 461 रुग्णांच्या आयुष्यात प्रकाश

47

पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन रोशनी’ने 461 रुग्णांच्या आयुष्यात प्रकाश
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी गडचिरोली पोलीस दलाने पोलीस दादालोरा खिडकी या माध्यमातून राबविलेला ‘ऑपरेशन रोशनी’ उपक्रम शेकडो रुग्णांसाठी जीवनात नवा उजेड घेऊन आला आहे. या उपक्रमांतर्गत दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल 461 नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूर व शालीनीताई मेघे रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. ऑक्टोबर व नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्तरावर एकूण 11 ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
या शिबिरांद्वारे तसेच मोबाईल हॉस्पिटल व्हॅनच्या माध्यमातून एकूण 1,473 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 461 रुग्णांची दोन टप्प्यांत जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व शालीनीताई मेघे रुग्णालय नागपूर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्व शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आल्याने दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमाबाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन रोशनी’मुळे हे सर्व रुग्ण आता नवीन व बदलते गडचिरोली आपल्या डोळ्यांनी पाहू शकणार आहेत. भविष्यातही ग्रामीण व आदिवासी भागातील अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,’ असे त्यांनी आवाहन केले.
मोफत व दर्जेदार उपचार मिळाल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी गडचिरोली पोलीस दलाच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले असून जिल्हा सामान्य रुग्णालय, रोटरी क्लब नागपूर व शालीनीताई मेघे रुग्णालयाचे आभार मानले आहेत.
हा उपक्रम अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, डॉ. मनिष मेश्राम, रोटरी क्लबचे राजीव वरभे, शालीनीताई मेघे रुग्णालयाचे अश्विन रडके, नेत्रतज्ज्ञ डॉ. राकेश चांदेकर, डॉ. सुनिल भड, डॉ. सुमित मंथनवार व डॉ. कृष्णा पिंपळे यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालयाची टीम, रोटरी क्लब व शालीनीताई मेघे रुग्णालयाच्या टीमसह सर्व पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व नागरी कृती शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here