गडचिरोली : माता मृत्यू प्रकरणावर प्रशासनाचा खुलासा; रुग्णवाहिका वेळेवरच पोहोचली

81

गडचिरोली : माता मृत्यू प्रकरणावर प्रशासनाचा खुलासा; रुग्णवाहिका वेळेवरच पोहोचली
– पुजारीकडे मुक्कामानंतर प्रकृती बिघडली; आरोग्य यंत्रणेची तत्काळ सेवा
The गडविश्व
गडचिरोली, दि.०४ : एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील माता मृत्यू प्रकरणाबाबत काही माध्यमांत रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने गरोदर मातेला सहा किलोमीटर पायी चालत जावे लागले आणि त्यातून तिचा मृत्यू झाला, असे वृत्त प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी तोडसा परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली व संबंधितांकडून सविस्तर माहिती घेतली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गरोदर माता रुग्णवाहिकेअभावी पायी चालत गेली, हा दावा पूर्णतः चुकीचा आहे. प्रत्यक्षात संबंधित महिला आलदंडी टोला येथून पेठा येथे एका पुजाऱ्याकडे गेली होती. तेथे तिने रात्री मुक्काम केला. दरम्यान, रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास अचानक तिची प्रकृती गंभीर झाली. परिस्थिती लक्षात येताच स्थानिक आशा स्वयंसेविकेला तात्काळ संपर्क करण्यात आला.
आशा स्वयंसेविकेने कोणताही विलंब न करता रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. रुग्णवाहिकेद्वारे गरोदर मातेला हेडरी येथील लॉईड्स कालीअम्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवरच उपलब्ध होती आणि आरोग्य यंत्रणेकडून तत्काळ सेवा देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच, संबंधित महिलेच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत आरोग्य विभागामार्फत नियमित गृहभेटी देण्यात आल्या होत्या. आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी तपासण्या करून आवश्यक मार्गदर्शन केले होते, असेही डॉ. शिंदे यांनी नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले की, ग्रामीण व दुर्गम भागातील माता-बाल मृत्यू प्रकरणांबाबत प्रशासन अत्यंत संवेदनशील असून प्रत्येक घटनेची सखोल चौकशी केली जाते. या प्रकरणात आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक ती तत्काळ सेवा पुरविण्यात आली असून, प्रशासनाकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आलेले नाही.
यावेळी प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले की, गरोदर माता किंवा कोणत्याही गंभीर आजाराच्या परिस्थितीत पुजारी, वैदू किंवा अंधश्रद्धेवर आधारित उपचारांकडे न जाता थेट शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा स्वयंसेविका किंवा रुग्णवाहिका सेवेकडे वेळेवर संपर्क केल्यास अनेक मौल्यवान जीव वाचू शकतात.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग मातृ व बाल आरोग्य सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, दुर्गम भागातही रुग्णवाहिका सेवा व आरोग्य यंत्रणा सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here