शासकीय आश्रम शाळा कोरची येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
– ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ एकपात्री नाटकाने वेधले लक्ष
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ०४ : येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, कोरची येथे स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण नियोजन व अंमलबजावणी विद्यार्थिनींनी स्वतः पुढाकार घेऊन यशस्वीपणे पार पाडली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. धनश्री परतेती होत्या, तर उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गीता राऊत, सुषमा अंबोणे, सिमा कुरेकार, भारती साखरे, प्रीती खंडाते, भैयालाल कुरसंगे, हरेश कामडी, अरुण कायदे, प्रमोद शंभरकर, मनोज गजभिये, अभिमन्यू वाटगुरे, गुरुराज मेंढे, कुणाल गोवर्धन, मनोज, भुमेश शेंडे, मयूर दोनाडकर आदी शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी साकारलेली सावित्रीबाईंची वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. विशेषतः ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ या प्रभावी एकपात्री नाटकातून सावित्रीबाईंचा संघर्षमय जीवनप्रवास जिवंतपणे उलगडण्यात आला. अध्यक्षीय भाषणात प्रा. धनश्री परतेती यांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील एक हृदयस्पर्शी प्रसंग कथन केल्याने उपस्थित वातावरण भावूक झाले.
मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक उमाकांत ढोक म्हणाले, “आजच्या आधुनिक युगात मुलींनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सावित्रीबाईंचे विचार, धैर्य आणि सामाजिक बांधिलकी आत्मसात करून खऱ्या अर्थाने ‘आधुनिक सावित्री’ घडणे ही काळाची गरज आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी क्षमा ताराम हिने नेटकेपणाने केले, तर आभार प्रदर्शन निकिता कांटेगे (इयत्ता अकरावी विज्ञान) हिने मानले. विद्यार्थिनींनी दाखवलेल्या नेतृत्वगुणांमुळे व उत्कृष्ट नियोजनामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.














