कुरखेडा : दारू तस्करीचा डाव फसला,६.३३ लाखांच्या मुद्देमालासह तिघे जाळ्यात

53

कुरखेडा : दारू तस्करीचा डाव फसला,६.३३ लाखांच्या मुद्देमालासह तिघे जाळ्यात
– पुराडा पोलिसांची मोठी कारवाई
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २८ : रामगड ते भटेगाव मार्गावर स्विफ्ट कारमधून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना पुराडा पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. या कारवाईत ४४७ सिलबंद दारूच्या बाटल्या, स्विफ्ट कार आणि तीन मोबाईल असा एकूण ६ लाख ३३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुराडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र म्हैसकर यांना चिलहाटी येथून स्विफ्ट कार क्रमांक MH 35 P 5847 मधून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रामगड ते भटेगाव मार्गावर नाकाबंदी केली.
दरम्यान, संशयित स्विफ्ट कार येताना दिसताच पोलिसांनी ती थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक प्रेम रंगारी याने पोलिसांच्या MH 33 AF 3292 आणि MH 34 BC 7215 क्रमांकाच्या दुचाकींना धडक देत कारसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार होण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पाठलाग करून तिघांनाही ताब्यात घेतले.
कारची झडती घेतली असता डिक्कीत २ लाख १ हजार १५० रुपये किमतीच्या ‘रॉयल स्टॅग’ मद्याच्या ४४७ सिलबंद बाटल्या आढळून आल्या. यासह ४ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार आणि ३२ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण ६ लाख ३३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी लखन जोहरी भैसा (४०, रा. बेळगाव, ता. कोरची), प्रेम संजय रंगारी (२०) आणि क्रिश संजय रंगारी (१८, दोघेही रा. चिलहाटी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) यांच्याविरुद्ध पुराडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुराडा पोलिस करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here