गडचिरोली जिल्हा रुग्णालयात १५ बालकांवर टंग टाय शस्त्रक्रिया यशस्वी
– आरबीएसके-डीईआयसीच्या माध्यमातून विशेष उपचाराची सुविधा
The गडविश्व
गडचिरोली, दि.२९ : जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आरबीएसके-डीईआयसी कार्यक्रमांतर्गत बालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘टंग टाय शस्त्रक्रिया शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण १५ बालकांवर टंग टायची (Tongue Tie) यशस्वी शस्त्रक्रिया २५ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत शालेय आरोग्य तपासणीदरम्यान टंग टायची समस्या आढळलेल्या बालकांना जिल्हा प्रारंभिक हस्तक्षेप केंद्र (DEIC) मार्फत पुढील तपासणी, संदर्भ सेवा आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यात आले.
टंग टायमुळे बालकांना बोलणे, उच्चार करणे तसेच काही वेळा आहार घेण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा बालकांचे वेळेवर निदान करून आवश्यक शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामुळे संबंधित बालकांना वेळेत विशेष उपचार मिळाले.
बालकांच्या आरोग्य समस्यांचे लवकर निदान, योग्य संदर्भ सेवा आणि आवश्यक विशेष उपचार एकाच माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले. वेळेवर उपचार मिळाल्याने बालकांच्या आरोग्याची गुणवत्ता आणि जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.













