४ कोटींवरून १०० कोटींकडे गडचिरोलीची झेप
– ‘महनिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन २०२६’मध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना निर्यातवाढीचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली जिल्हा विकासाच्या वेगवान मार्गावर असून निर्यात क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली आहे. जिल्ह्याची निर्यात अवघ्या काही वर्षांत ४ कोटींवरून ३२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, येत्या काळात ती १०० कोटींच्या पुढे नेण्यासाठी उद्योजकांनी नियोजनबद्ध व सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा यांनी केले.
जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित ‘महनिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन २०२६’ या एकदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने राज्यातील नवउद्योजक, एमएसएमई व निर्यातक्षम उद्योगांना चालना देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, निर्यात वाढीसाठी क्लस्टर विकास, ब्रँडिंग व पॅकेजिंग या बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. नाशिक व नागपूर जिल्ह्यांनी ब्रँडिंगच्या माध्यमातून निर्यात कशी वाढविली याचा अभ्यास करून गडचिरोलीतील उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा. तांदूळ, वनउपज, चारोळी, मोहा आदी उत्पादनांवर आधारित आजीविका क्लस्टर जिल्ह्यात विकसित झाले असून, या उत्पादनांना एकत्रित बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सामायिक पोर्टल उभारण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे दुर्गम तालुक्यांतील उत्पादकांनाही निर्यात प्रक्रियेत थेट सहभागाची संधी मिळणार आहे.
लघुउद्योजकांना उद्योगासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, रिक्त व कमी वापरातील औद्योगिक भूखंड विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठी संधी असून उद्योजकांनी नवे प्रयोग आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले तर यश निश्चित आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उद्योग सहसंचालक शिवकुमार मुद्दमवार यांनी ‘एक तालुका – दहा निर्यातदार’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी बांबू धोरण, लॉजिस्टिक धोरण, औद्योगिक धोरण तसेच ‘मैत्री कायदा’ अंतर्गत उपलब्ध १४६ सेवा व १४ विभागांच्या परवानग्यांची सविस्तर माहिती दिली.
या परिषदेच्या कार्यशाळेत जिल्ह्यातील १५० हून अधिक उद्योजक, नवउद्योजक व शेतकरी गटांनी सहभाग नोंदविला. मैत्री कक्षामार्फत श्री. विजय शिंदे व श्रीमती युगा देवधर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्योग सुलभीकरणाबाबत मार्गदर्शन केले. डीजीएफटी, नागपूरचे प्रतिनिधी प्रतीक गजभिये यांनी निर्यात प्रक्रिया व आर्थिक सहाय्य योजनांची माहिती दिली. इंडिया पोस्टचे श्रीहरी कुंभार यांनी डाक निर्यात केंद्राबाबत मार्गदर्शन केले, तर न्यू इंडिया अॅश्युरन्सचे मयूर कावरे यांनी एमएसएमई विमा योजनांची माहिती दिली. महास्ट्राईडचे उद्योग तज्ज्ञ रंजन पांढरे यांनी स्टील व धातूआधारित उपपुरक उद्योगांच्या संधी स्पष्ट केल्या. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी भास्कर मेश्राम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनमोल कोरे यांनी केले. उद्योग विभागाच्या विविध योजनांची माहिती देत त्यांनी उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उद्योग सहसंचालक, नागपूर विभाग यांच्या वतीने आभार मानून परिषदेचा समारोप करण्यात आला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













