घोट जंगलात सागवान तस्करी उघड : १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

110

घोट जंगलात सागवान तस्करी उघड : १९ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : आलापल्ली वनविभाग अंतर्गत येणाऱ्या घोट वनपरिक्षेत्रातील गरंजी जंगल परिसरात वनविभागाने रात्रीच्या सुमारास धडक कारवाई करत मोठी सागवान तस्करी उघडकीस आणली. तपासणीस न थांबता पळ काढणारे वाहन कोटमी गावात सोडून देत तस्कर फरार झाले.
वनगस्ती दरम्यान संशयास्पद वाहन क्रमांक CG-07-CT-6735 व एक मोटारसायकल थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाहनचालकांनी शासकीय वाहनाला कट मारत वेगाने पळ काढला. पाठलागानंतर कोटमी गावात वाहन सोडून दोन इसम पसार झाले, तर मोटारसायकलवरील तीन इसम पळून जाण्यात यशस्वी ठरले.
वाहनाची तपासणी केली असता प्लास्टिक व भंगाराच्या आड सागवान प्रजातीचे १३ नग लाकूड (३.४२७ घनमीटर) आढळून आले. जप्त सागवान लाकडाची किंमत ४.०८ लाख रुपये, तर वाहनाची किंमत अंदाजे १५ लाख रुपये असून एकूण १९.०८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर सर्जेराव वाडीघरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वृक्षतोड व तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात अशा कारवायांमुळे जंगलसंपत्तीचे संरक्षण अधिक प्रभावी होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, अवैध वृक्षतोड, सागवान तस्करी किंवा अन्य कोणत्याही वनगुन्ह्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here