गडचिरोली : उष्णतेच्या लाटेचा इशारा, कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
– दुपारच्या कामावर मर्यादा, सावली-पाणी अनिवार्य : जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : जिल्ह्यातील वाढत्या तापमानाने नागरिकांचे हाल सुरू असतानाच उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांसाठी परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवत कामगारांच्या आरोग्य सुरक्षेसाठी कडक उपाययोजना अमलात आणल्या आहेत.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देत बांधकाम, वीटभट्टी, खाणकाम आणि शेती क्षेत्रातील असंघटित कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत.
उष्णतेच्या तीव्रतेचा विचार करून कामाच्या वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश देण्यात आले असून दुपारच्या कडक उन्हात काम टाळण्यावर भर देण्यात आला आहे. सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या तुलनेने थंड वातावरणात जड कामे करण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.
कामाच्या ठिकाणी सावलीची व्यवस्था, थंड पिण्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट्स तसेच आपत्कालीन वापरासाठी ‘आईस पॅक’ उपलब्ध ठेवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. उष्णतेचा त्रास जाणवत असल्यास कामाचा वेग कमी करण्यास परवानगी देण्याचेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय कामगारांनी गटांमध्ये काम करण्यावर भर देण्यात आला असून एकमेकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे उष्णतेशी संबंधित त्रास वेळेत ओळखून तातडीने उपचार मिळू शकणार आहेत.
दरम्यान, जनजागृतीसाठी लेबर चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या धोक्यांविषयी पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात येणार आहेत. कामगारांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष देखरेख यंत्रणा उभारण्यात आली असून संबंधित विभागांना साप्ताहिक अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांनी स्वतःची काळजी घेत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














