ठाणेगाव–डोंगरगावात भाजप–एनडीएच्या विजयाचा जल्लोष
– फटाक्यांची आतिषबाजी, पेढे वाटपाने उत्साह शिगेला
The गडविश्व
आरमोरी, दि.०५ : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरी येथील विधानसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) यांना मिळालेल्या घवघवीत यशाचे पडसाद आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव–डोंगरगाव येथे उमटले. निकाल जाहीर होताच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात विजय साजरा केला.
ठाणेगाव–डोंगरगाव येथील मुख्य चौकात कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले. ‘भारत माता की जय’ आणि ‘भाजपचा विजय असो’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या प्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा परिपाक आहे. आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे.’
कार्यक्रमाला संतोष चलाख, मोतीलाल नारदेलवार, रेवनाथ धोटे, ओंकार सिंग डांगी, भोलेनाथ नार्देलवार, अनुप नैताम, चरणदास गुळंकवार, खुशाल नार्देलवार, रवी प्रधान, नरहरी ढोरे, मीननाथ माकडे, पियुष चंदनखेडे, विकास पायदलवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आसाममध्ये पुन्हा सत्ता मिळवणे तसेच पश्चिम बंगाल व पुड्डूचेरीमध्ये पक्षाची ताकद वाढवणे हे भाजपच्या संघटन कौशल्याचे द्योतक असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी नमूद केले. या विजयामुळे स्थानिक स्तरावर नवचैतन्य निर्माण झाले असून, गावागावात पक्षविचार पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत विजयाचा आनंद द्विगुणित केला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














