देसाईगंज : दोन महिन्यांपासून रस्ता खोदूनच, नाली काम ठप्प – कोंढाळा ग्रामस्थ संतप्त

38

देसाईगंज : दोन महिन्यांपासून रस्ता खोदूनच, नाली काम ठप्प – कोंढाळा ग्रामस्थ संतप्त
The गडविश्व
ता.प्र/ देसाईगंज, दि. ०४ : तालुक्यातील कोंढाळा ग्रामपंचायत हद्दीत नाली बांधकामाच्या नावाखाली दोन महिन्यांपूर्वी करण्यात आलेले खोदकाम अद्याप अपूर्ण अवस्थेतच पडून असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः पहिल्या वॉर्डातील मुख्य वस्त्यांमधील रस्ते खोदून ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींना मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायतीने नाली बांधकामासाठी रस्ते खोदले मात्र त्यानंतर कामाला कोणतीही गती मिळाली नाही. परिणामी, रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे साचले असून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी घाण पाणी साचून राहिले आहे. यामुळे दुर्गंधी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खोदलेल्या नाल्यांमुळे स्थानिकांना घराबाहेर पडताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात लाकडी पाट्या टाकून ये-जा सुरू ठेवली आहे. लहान मुले व वृद्धांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असून, रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे. “काम सुरू करायचे नव्हते तर रस्ते खोदून का ठेवले?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सरपंचांकडून “काम मंजूर नसल्याने खोदलेला रस्ता पुन्हा बुजविण्यात येईल” अशी माहिती दिली जात असल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.
याबाबत पंचायत समिती देसाईगंज येथील अभियंता नवीन सोरते यांच्याशी संपर्क साधला असता, “अशा प्रकारचे कोणतेही काम मंजूर नाही, तसेच या खोदकामाबाबत मला कोणतीही माहिती नाही,” असे स्पष्ट करण्यात आले.
पावसाळा तोंडावर असताना दोन महिन्यांपासून रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून रखडलेले काम मार्गी लावावे, अशी मागणी कोंढाळा ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here