कुरखेडाचा प्रस्तावित विकास आराखडा रद्द करा ; अन्यथा जनआंदोलन छेडणार

64

कुरखेडाचा प्रस्तावित विकास आराखडा रद्द करा ; अन्यथा जनआंदोलन छेडणार
– ‘आप’चा नगर पंचायत प्रशासनाला इशारा
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०५ : कुरखेडा नगर पंचायत क्षेत्रासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या विकास आराखड्यावरून वाद निर्माण झाला असून, आम आदमी पार्टी (आप), गडचिरोलीने या आराखड्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. सदर आराखडा तात्काळ रद्द करण्याची मागणी करत प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
यासंदर्भात ‘आप’चे जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी यांनी सहाय्यक नगररचनाकार यांना निवेदन सादर केले. निवेदनात आराखडा तयार करताना काही खाजगी जागांचे जाणीवपूर्वक आरक्षण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, अकृषक (NA) मान्यता असलेले महत्त्वाचे सेवा रस्ते आराखड्यातून वगळण्यात आल्याची बाबही समोर आली आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ९ मधील न्यायालयात प्रलंबित असलेला १२ मीटरचा सेवा रस्ता नकाशातून काढून टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नगर पंचायतीने यापूर्वी हटवलेल्या अतिक्रमणांच्या ठिकाणी असलेले रस्तेच नव्या आराखड्यात नसल्याने अतिक्रमणधारकांना अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोपही ‘आप’ने केला आहे.
दरम्यान, बायपास रस्त्यासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन अधिग्रहित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याने शेतकरी वर्गात संतापाची भावना आहे.
हा विकास आराखडा अद्याप शासन स्तरावर मंजूर झालेला नसल्याने तो रद्द करण्याची संधी नगर पंचायतीकडे असल्याचे ‘आप’चे म्हणणे आहे. पुढील ८ दिवसांत प्रशासनाने लेखी भूमिका स्पष्ट न केल्यास बाधित नागरिक व शेतकऱ्यांसह उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नसीर हाशमी यांनी दिला आहे.
या आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीसाठी नगर पंचायत प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन सादर करताना जिल्हा सचिव अमृत मेहेर, उम्देव देशमुख, भास्कर देशमुख आदी उपस्थित होते.
या घडामोडींमुळे कुरखेडा शहरात विकास आराखड्यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here