पेसा मोबिलायझर्स पद रद्दीकरणाविरोधात पुण्यात राज्यव्यापी आंदोलन ; गडचिरोलीतून महिलांचा मोठा सहभाग

48

पेसा मोबिलायझर्स पद रद्दीकरणाविरोधात पुण्यात राज्यव्यापी आंदोलन; गडचिरोलीतून महिलांचा मोठा सहभाग
– उद्या पंचायत राज संचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : पेसा ग्रामसभांमधील मोबिलायझर्स पदे रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभर तीव्र असंतोष निर्माण झाला असून, या निर्णयाच्या निषेधार्थ ६ मे रोजी पुणे येथे राज्यस्तरीय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी गडचिरोली जिल्ह्यातून पेसा मोबिलायझर्स संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला पुण्याकडे रवाना झाल्या असून, सिटूचे कॉ. अमोल मारकवार, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड तसेच आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नसिर हाशमी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग राहणार आहे.
पुण्यातील पंचायत राज संचालक कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात येणार असून, राज्य सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला जाणार आहे. हा निर्णय कामगारविरोधी व अन्यायकारक असल्याचा आरोप करत तो तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांतील पेसा मोबिलायझर्स मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीकडून देण्यात आली आहे.
पेसा मोबिलायझर्स संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. पेसा मोबिलायझर्स पद रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे, सर्व मोबिलायझर्सना पुन्हा कामावर घेणे तसेच आदिवासी भागातील रोजगार व हक्क अबाधित ठेवणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी सरकारवर दबाव वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, आदिवासी व कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारे निर्णय सहन केले जाणार नाहीत, असा ठाम इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here