गडचिरोलीत नीट परीक्षेत खळबळ : एआयच्या मदतीने कॉपीचा मोठा प्रकार उघड
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट (NEET) परीक्षेत गडचिरोली शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कॉपी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या सहाय्याने प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रविवारी (०३) दुपारच्या सुमारास धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे तपासणी करण्यात आली. ही विद्यार्थिनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील असून तिच्याकडे बेकायदेशीररित्या मोबाइल आढळून आला. तपासादरम्यान तिने चालू वर्षाची प्रश्नपत्रिका कपड्यांमध्ये लपवून जुन्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे मुखपृष्ठ जोडत निरीक्षकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे केंद्रावरील देखरेख व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, गोकुळनगर येथील दुसऱ्या ‘शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ, विद्यान महाविद्यालय’ केंद्रावर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. आष्टी येथील एका विद्यार्थ्याने मोबाइलच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ते एआयकडे पाठवून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. संबंधित मोबाइलमधील चॅटिंगमधून हा प्रकार स्पष्ट झाला असून, तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे गैरवापर केल्याने परीक्षेच्या विश्वसनीयतेलाच तडा गेला आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांना रंगेहात पकडण्यात आले असून, केंद्रप्रमुख राजकुमार नंदागवळी आणि अरुण मुनघाटे यांच्या तक्रारीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा, तपासणी यंत्रणा आणि नियंत्रण प्रक्रियेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. शिक्षण व्यवस्थेतील प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता टिकवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तत्काळ कठोर पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #NEETExam #ExamFraud #AI #EducationScam #BreakingNews #IndiaNews #ExamCheating #DigitalFraud #EducationSystem














