गडचिरोलीत खळबळ : शेतातच गांजा लागवड, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली), दि. ०६ : धानोरा तालुक्यातील परसवाडी येथे शेतातच गांजा लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून ४ मे रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे २७ लाख २५ हजार रुपये किमतीचा ५४.५ किलो गांजा जप्त करण्यात आला असून एका शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांच्या पथकाने प्रि-ट्रॅप पंचनामा करून परसवाडी येथे छापा टाकला. या वेळी पंच, वजन माप अधिकारी तसेच राजपत्रित अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले उपस्थित होते.
पथकाने आरोपी मोरेश्वर हिरामन उसेंडी (वय ५८, रा. परसवाडी, ता. आरमोरी) यांच्या शेताची पाहणी केली असता गांजासदृश्य झाडे आढळून आली. खात्री केल्यानंतर ती गांजा वनस्पती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पंचासमक्ष एकूण ३९ झाडे उपटून जप्त करण्यात आली.
जप्त केलेल्या गांज्याचे सहा पोतळ्यांमध्ये वर्गीकरण करून वजन करण्यात आले असता एकूण ५४.५ किलो अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे २७ लाख २५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय घटनास्थळावरील मातीचे नमुनेही पुराव्यासाठी जप्त करण्यात आले.
सदर मुद्देमाल पंच, अधिकारी व आरोपी यांच्या सहीने सील करून पोलीस स्टेशन धानोरा येथे जमा करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध ‘एनडीपीएस’ कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #Gadchiroli #Dhanora #CrimeNews #CannabisSeizure #DrugBust #NDPSAct #PoliceAction #MaharashtraNews #BreakingNews #GanjaSeized














