– शेतकऱ्यांना तीन दिवसांत मदत नसेल तर मुंडन आंदोलन करण्याचा काँग्रेसचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : गडचिरोली जिल्हा हा शेतीवर आधारित असून जिल्ह्यातील शेकडो नागरिकांचा व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाची तसेच काही ठिकाणी कपाशी आणि सोयाबीनची शेती करतात. खरीप हंगामातील सर्व पीक काढणीसाठी आले असताना, आता पिक काढण्याच्या वेळेत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास हिरावला जात आहे.
रानटी हत्ती आणि इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे आधीच शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना, पुन्हा या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांच्या सोबत राज्याचे वित्त राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल हे सहपालकमंत्री असतानाही, या दोघांपैकी कोणत्याही पालकमंत्र्यांनी अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.
त्यामुळे “पालकमंत्री दोन, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाईल कोण?” असा प्रश्न गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे.
तीन दिवसांच्या आत जर कोणत्याही एका पालकमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर केली नाही, तर पालकमंत्र्यांचा निषेध म्हणून आणि शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांसह मुंडन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













