– ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान अर्ज सादर करण्याचे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३ : गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या -जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद – निवडणुकांचा बिगुल वाजला असून, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीकडून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची मुदत ३ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर २०२५ अशी ठेवण्यात आली असून, इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हा काँग्रेस कार्यालय, गडचिरोली तसेच आमदार रामदास मसाराम जनसंपर्क कार्यालय, वडसा किंवा संबंधित तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्षांमार्फत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
अर्ज सादरीकरणासाठी शुल्क नगराध्यक्ष पदासाठी खुला प्रवर्ग 5000/- तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिलांसाठी 2500/-; नगरपरिषद सदस्य खुला प्रवर्ग 2000/- तर SC, ST व महिलांसाठी ₹/1000/-; जिल्हा परिषद सदस्य खुला प्रवर्ग 2500/- तर SC, ST व महिलांसाठी 1250/-; तसेच पंचायत समिती सदस्य खुला प्रवर्ग 1500/- तर SC, ST व महिलांसाठी 750/- इतके निश्चित करण्यात आले आहे.
प्राप्त अर्जांपैकी निवड प्रक्रियेचा भाग म्हणून ६ नोव्हेंबर २०२५ रोजी गडचिरोली येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात गडचिरोली, आरमोरी व वडसा नगर परिषद क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत जिल्हा निवड मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या काँग्रेसच्या जनआधार बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगून ब्राह्मणवाडे यांनी पक्षनिष्ठ, जनतेशी नाळ जपणारे व प्रामाणिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #Congress #Elections2025 #LocalBodyElections #ZillaParishad #PanchayatSamiti #NagarParishad #MahendraBrahmanwade #PoliticalNews #MaharashtraPolitics #GadchiroliNews #CongressParty













