बंदुकीऐवजी संविधानाचा मार्ग निवडा : गडचिरोलीत डाव्या पक्षांचे नक्षल्यांना आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : भारत हा संविधानावर चालणारा लोकशाहीवादी देश असून बंदुकीच्या जोरावर सामान्य जनतेचे प्रश्न सुटू शकत नाहीत, असा ठाम संदेश देत गडचिरोलीतील डाव्या पक्षांच्या नेत्यांनी उर्वरित नक्षलवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
केंद्राच्या गृहविभागाने ३१ मार्चपर्यंत नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पणाची अंतिम मुदत जाहीर केल्यानंतर एट्टापल्ली तालुक्यातील संपर्क दौऱ्यावर असताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव काॅ. सचिन मोतकुरवार यांनी गिलनगुडा येथे भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील शेवटचा नक्षलवादी जयराम उर्फ नंदू मोंगे गावळे याच्या कुटुंबीयांशी संवाद साधत त्याने बंदुकीचा त्याग करून लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नेत्यांनी सांगितले की, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी गेल्या अनेक दशकांपासून संसद, विधिमंडळ आणि रस्त्यावरच्या लढ्याच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठी संघर्ष केला आहे. रोजगार हमी योजना, पेसा कायदा, वनाधिकार कायदा यांसारखे महत्त्वाचे निर्णय हे लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाचे फलित आहेत. त्यामुळे सशस्त्र मार्गाने जनतेचे भले होईल ही कल्पना अवास्तव ठरली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नक्षलवाद्यांनी बंदुकीचा मार्ग सोडून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, तसेच डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली घटनात्मक मार्गाने जनतेच्या हक्कांसाठी लढा द्यावा, असे आवाहन करण्यात आले. आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येणाऱ्यांचे पक्षात स्वागत करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. या आवाहनात काॅ. सुरज जक्कुलवार यांचाही सहभाग होता.
“नंदू, आता घरी परत ये” : वडिलांचे भावनिक आवाहन
दरम्यान, जयराम उर्फ नंदू मोंगे गावळे याचे वडील मोंगे गावळे यांनी मुलाला भावनिक साद घालत घरी परत येण्याचे आवाहन केले. घरगुती कारणावरून नंदू घर सोडून गेला आणि नक्षल दलममध्ये सहभागी झाला. तेव्हापासून तो घरी परतलेला नाही. आता अनेक वरिष्ठ नक्षलवादी चळवळ सोडून गेले आहेत. त्यामुळे जंगलात राहण्यापेक्षा नंदूने घरी परत यावे, अशी विनंती त्यांनी केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews














