धानोरा : सीआरपीएफ ११३ बटालियनचा ३६ वा स्थापना दिन उत्साहात साजरा
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १ : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ११३ बटालियनचा ३६ वा स्थापना दिवस धानोरा येथील मुख्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बटालियनचे कमांडंट जसवीर सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष रंगत आली.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर कॅम्प परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानिमित्त आयोजित सैनिक संमेलनात कमांडंट जसवीर सिंग यांनी बटालियनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेत, जवानांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचे तसेच कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावण्याचे आवाहन केले.
११३ बटालियनची स्थापना १ एप्रिल १९९१ रोजी आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी येथे झाली असून, देशातील विविध संवेदनशील भागांमध्ये सेवा बजावल्यानंतर २३ ऑक्टोबर २००९ रोजी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेसाठी तैनाती करण्यात आली आहे.
स्थापना दिनानिमित्त ‘वॉलीबॉल’ व ‘टग ऑफ वॉर’ यांसारख्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जवानांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी मनोरंजन कार्यक्रम व सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या प्रसंगी सीएमओ (एसजी) अमिक नारायण, सेकंड कमांडिंग ऑफिसर एम. आर. अन्सारी, डेप्युटी कमांडंट गुलाब सिंग, असिस्टंट कमांडंट बाबू सिंग यांच्यासह इतर अधिकारी व जवान उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora














