निसर्गाचा कोप! कुरखेडा तालुक्यात वादळी पावसाचा कहर, मका पीक भुईसपाट

56

निसर्गाचा कोप! कुरखेडा तालुक्यात वादळी पावसाचा कहर, मका पीक भुईसपाट
The गडविश्व
ता. प्र/ गडचिरोली, दि. ०१ : कुरखेडा तालुक्यावर ३० मार्च रोजी निसर्गाच्या अवकृपेचा मोठा फटका बसला. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वेगवान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेती पिकांची अक्षरशः दाणादाण उडवली. उराडी परिसरात या वादळाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला असून, शेतकरी योगाजी मस्के यांचे उभे मका पीक पूर्णतः भुईसपाट झाले आहे.
उराडी येथील शेतकरी योगाजी मस्के यांनी यंदा मोठ्या आशेने मका पिकाची लागवड केली होती. पिकाची स्थिती उत्तम असल्याने चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती; मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने सर्व गणिते बिघडवली. जोरदार वाऱ्यामुळे मक्याची ताटे मोडून पडली असून संपूर्ण पीक जमिनीवर लोळले आहे. मस्के यांच्यासह उराडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांची हीच अवस्था झाली असून, काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
मका पीक आडवे झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापणीचा खर्च आणि झालेले नुकसान पाहता लावलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. जमिनीवर पडलेल्या मक्याच्या कणसांमध्ये सड येण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी परिसरातील बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
दरम्यान, या अस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. महसूल व कृषी विभागाने त्वरित उराडी परिसरात भेट देऊन पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. विशेषतः योगाजी मस्के यांच्यासारख्या शेतकऱ्यांना तातडीने आधार देण्याची गरज व्यक्त होत असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here