वडिलांच्या स्मृतींना लेखणीची सलामी; ३५० विद्यार्थ्यांना पेनची भेट

13

वडिलांच्या स्मृतींना लेखणीची सलामी; ३५० विद्यार्थ्यांना पेनची भेट
– शिक्षक दिनी माजी विद्यार्थ्यांचा भावनिक उपक्रम; गुरुजनांचा वारसा जपण्याचा संदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी आगळावेगळा उपक्रम राबविला. याच शाळेत विद्यार्थी म्हणून शिक्षण घेऊन पुढे शिक्षक म्हणून सेवा बजावलेल्या दिवंगत गुरुजनांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांच्या मुलांनी शाळेतील सुमारे ३५० विद्यार्थी व शिक्षकांना प्रत्येकी तीन पेन भेट दिले.
स्व. बी. डी. धकाते, स्व. मनोहरराव कोपुलवार, स्व. संभाजी होकम, स्व. प्रभाकरराव रोटकर आणि स्व. देवराव नगराळे या दिवंगत शिक्षकांच्या मुलांनी एकत्र येत हा उपक्रम साकारला. शासकीय माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला मूर्त रूप मिळाले.
यावेळी उदय धकाते यांनी शाळेच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देत या शाळेतून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा आणि गुरुजनांचा अभिमान बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.
सोशल मीडियाचा वापर करताना सकारात्मक माहिती आणि ज्ञान आत्मसात करावे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करताना स्वतःची विचारशक्ती, वाचन आणि ज्ञान कमी होणार नाही याची काळजी घ्यावी, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी माजी विद्यार्थी जितेंद्र मनोहर कोपुलवार, उमेश प्रभाकर रोटकर, विश्राम संभाजी होकम, शोभाताई नगराळे-निरंजने, सुरेखा न्यालेवार-घुमारे, समीर कडीवाल, निलेश दंडवते, सेवानिवृत्त शिक्षक अरुण पोगळे, प्राचार्य एकनाथ टेकाम, सहाय्यक शिक्षक बेलखोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सपना देशमुख यांनी केले.
‘वडिलांनी दिले ज्ञानाचे संस्कार; त्यांच्या स्मृतींना लेखणीची मानवंदना’, या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम गुरुजनांच्या स्मृती जपण्यासोबतच विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा देणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here