अहेरीतून पुन्हा पेटणार विदर्भ आंदोलनाची ज्योत; २०२७ पूर्वी राज्यनिर्मितीचा निर्धार

16

अहेरीतून पुन्हा पेटणार विदर्भ आंदोलनाची ज्योत; २०२७ पूर्वी राज्यनिर्मितीचा निर्धार
– ११ जिल्हे, १२० तालुक्यांत जनजागरण; ८ सप्टेंबरला ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा धार देण्याचा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. ३१ डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याचा संकल्प समितीने केला असून, त्यासाठी विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांत व्यापक जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा भाग म्हणून ८ सप्टेंबर रोजी अहेरी येथे ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अहेरी येथील महागाव रोडवरील इंडियन पॅलेस फंक्शन हॉलमध्ये दुपारी १ वाजता हा मेळावा होणार आहे. समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राहणार असून, ‘देशोन्नती’चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्यासह विदर्भ आंदोलनातील विविध पदाधिकारी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला अहेरीच्या भूमीशी ऐतिहासिक संदर्भ असल्याचे समितीने नमूद केले. माजी खासदार राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी १९५७ मध्ये नागविदर्भ आंदोलन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भासाठी लोकलढा उभारला होता. त्यानंतर माजी आमदार राजे सत्यवानराव आत्राम यांनीही ही चळवळ पुढे नेली. त्यामुळे अहेरीतून पुन्हा विदर्भ आंदोलनाची ज्योत पेटविण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.
दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांत ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्यात येणार असल्याचेही पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. नागपूर करारातील आश्वासनांची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप समितीने केला आहे.
महाराष्ट्रावरील वाढते कर्ज, विदर्भातील सिंचनासह विविध क्षेत्रांतील अनुशेष तसेच राज्यातील पोलीस दलातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांचा दाखला देत स्वतंत्र विदर्भ हाच विकासाचा पर्याय असल्याचा दावा समितीने केला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळविण्यासाठी आगामी काळात विविध स्तरांवर जनजागरण आणि आंदोलन करण्यात येणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनसंकल्प मेळाव्यास विदर्भातील नागरिक, युवक, महिला आणि विदर्भवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले. पत्रकार परिषदेला अरुण मुनघाटे, अशोक पोरेड्डीवार, कपील इद्दे, प्रकाश ताकसांडे, चंद्रशेखर भडांगे, सुनील पोरेड्डीवार, मारोतराव बोथले, मोतीराम लाटेलवार आदी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here