विकास विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सन्मान
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०५ : विकास विद्यालय तथा थोरावी कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, कुरखेडा येथे भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अलगदेवे होते, तर माजी मुख्याध्यापक खुणे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगणारी भाषणे, कविता तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक अलगदेवे यांनी शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मार्गदर्शक असल्याचे सांगितले. शिक्षकांकडून मिळणारे ज्ञान, संस्कार व शिस्त आत्मसात करून विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासोबतच जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.













