जिल्हा वार्षिक योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा
– निधी खर्चात शिस्त, गुणवत्ता व लोकाभिमुखतेवर भर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : जिल्हा वार्षिक योजना २०२५–२६ अंतर्गत सर्व यंत्रणांनी शासन नियमांचे काटेकोर पालन करत विहित कालमर्यादेत निधी खर्च करावा. निधी वापरताना गुणवत्ता, उपयुक्तता व लोकाभिमुखतेला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी उर्वरित प्रशासकीय मान्यता, निधी वितरण तसेच सन २०२६–२७ साठीच्या प्रारूप आराखड्यांवर चर्चा करण्यात आली. ज्या कार्यालयांनी अद्याप प्रारूप आराखडे सादर केलेले नाहीत, त्यांनी ते तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी विक्री केंद्रांची उभारणी, दूध प्रक्रिया उद्योगांना चालना देणे, सर्व शासकीय कार्यालये सौरऊर्जेवर आधारित करण्याबाबत प्रस्ताव सादर करणे, तसेच नाविन्यपूर्ण व व्यवहार्य योजनांचे दर्जेदार प्रस्ताव मांडण्यावर त्यांनी भर दिला. प्रस्ताव सादर करताना शासनाने निश्चित केलेल्या उच्चतम खर्च मर्यादेच्या चौकटीतच ते राहतील, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर ४५६ कोटी रुपयांच्या नियतव्ययापैकी आतापर्यंत ४४५ कोटी ७८ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित सुमारे ९ कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रलंबित असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने तांत्रिक मान्यता सादर करून प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव पूर्ण स्वरूपात दाखल करावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या आढावा बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
albacete vs real madrid, भारत बनाम न्यूजीलैंड, warriorz vs capitals, chelsea vs arsenal, pongal kolam 2026














