२५ वर्षांच्या सेवेला गौरवाची सलामी : प्रा. टिकाराम धाकडे यांचा सेवानिवृत्ती कृतज्ञता सोहळा उत्साहात
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०९ : श्री जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय, धानोरा येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ प्राध्यापक टिकाराम धाकडे यांनी २५ वर्षांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत व विद्यार्थीकेंद्री सेवेनंतर ३१ डिसेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सन्मानार्थ ७ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्ती कृतज्ञता व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थुल होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजू किरमिरे, डॉ. विना जंबेवार, तसेच धाकडे सरांच्या अर्धांगिनी सौ. दिक्षा धाकडे, कन्या अनुश्री धाकडे व प्रा. निवेदिता वटक मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात सहकारी प्राध्यापकांनी धाकडे सरांच्या सहवासातील अनुभव, आठवणी आणि मार्गदर्शनाचे क्षण व्यक्त करताना सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. उदय थुल यांनी, “प्रा. टिकाराम धाकडे यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला असून त्यांचे योगदान महाविद्यालयासाठी कायम प्रेरणादायी राहील,” असे गौरवोद्गार काढले.
प्रा. टिकाराम धाकडे यांनी आपल्या सेवाकाळात केवळ अध्यापनापुरतेच न थांबता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योगदान दिले. शिस्त, प्रामाणिकपणा, अभ्यासू वृत्ती आणि मार्गदर्शक स्वभावामुळे ते विद्यार्थी व सहकाऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक प्रगतीत त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतात प्रा. टिकाराम धाकडे यांनी महाविद्यालय, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही शिक्षण क्षेत्राशी आपले नाते कायम ठेवण्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कैलास खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. वसंत आवारी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विराग रणदिवे यांनी केले.













