महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर

94

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर
– १,२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ९ : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलातर्फे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस मुख्यालय गडचिरोली, उप-मुख्यालय प्राणहिता (अहेरी), उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा तसेच पोलीस स्टेशन देसाईगंज येथे एकाचवेळी पार पडलेल्या या शिबिरात एकूण १,२०३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे या उपक्रमात आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
२ जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त दि. २ ते ८ जानेवारी दरम्यान ‘पोलीस रेझिंग डे सप्ताह’ अंतर्गत शस्त्र प्रदर्शन, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती मोहीम, रस्ता सुरक्षा रॅली, महिला सुरक्षा रॅली, सायबर जनजागृती यांसह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांच्या समारोपाच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी, डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर व शालिनीताई मेघे रक्तपेढी नागपूर यांच्या सहकार्याने पांडू आलाम सभागृह, पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता, सिरोंचा व देसाईगंज येथे रक्तसंकलन करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलातर्फे आतापर्यंत पाच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये एकूण ४,३६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. यंदाच्या शिबिरात पोलीस अधिकारी, कर्मचारी, सीआरपीएफ व एसआरपीएफचे जवान, विविध शासकीय विभागांचे कर्मचारी, आठ आत्मसमर्पित माओवादी सदस्य तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही. रक्तदानाच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळते. समाजाचा जबाबदार घटक म्हणून प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक असून इतरांनाही यासाठी प्रेरित केले पाहिजे. रक्तदानामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो, हीच या उपक्रमाची खरी प्रेरणा आहे.
गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र, देसाईगंज येथे शालिनीताई मेघे रक्तकेंद्र, अहेरी येथे शालिनीताई मेघे रक्तकेंद्र व उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र, तर सिरोंचा येथे डॉ. हेडगेवार रक्तकेंद्राच्या चमूंनी रक्तसंकलनाची जबाबदारी सांभाळली.
या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, अजय कोकाटे, रविंद्र भोसले, संदेश नाईक यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकारी, रक्तकेंद्रांचे प्रतिनिधी व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन व पोलीस मदत केंद्रांचे प्रभारी, नागरी कृती शाखा व सर्व रक्तकेंद्रांच्या चमूंनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here