देसाईगंज पोलीसांकडून १९.६७ लाखांचा मुद्देमाल नष्ट

70

देसाईगंज पोलीसांकडून १९.६७ लाखांचा मुद्देमाल नष्ट
– दारुबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई
The गडविश्व
देसाईगंज, दि. ९ : गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतानाही अवैध दारूची वाहतूक व विक्री करण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२३ ते २०२५ या कालावधीत दाखल असलेल्या एकूण ३७२ दारुबंदी गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमालाची विल्हेवाट लावत मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १९ लाख ६७ हजार ७३० रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेण्याच्या निर्देशानुसार ही कारवाई राबविण्यात आली. जप्त दारूचा मुद्देमाल नाशवंत स्वरूपाचा असून नवीन गुन्ह्यांमध्ये सातत्याने मुद्देमाल जप्त होत असल्याने पोलीस ठाण्यात जागेअभावी दीर्घकाळ साठवण करणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे न्यायालयीन परवानगी घेऊन ६ जानेवारी २०२६ रोजी देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत जप्त मुद्देमाल नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली.
न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, देसाईगंज यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक शुभम चौधरी उपस्थित होते. या कारवाईत विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ४०२ बाटल्या, २ लिटर मापाच्या १२ प्लास्टिक बाटल्या, ९० मिलीच्या ११० बाटल्या, देशी दारूच्या १८० मिलीच्या ४ बाटल्या, देशी दारूच्या ९० मिलीच्या तब्बल २०,९१६ बाटल्या, ५०० मिलीचे ८२ बिअर कॅन तसेच ३०० मिलीच्या ७ बिअर बाटल्या असा एकूण १९.६७ लाख रुपयांचा मुद्देमाल दोन पंचांच्या साक्षीने जेसीबी व रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला.
नष्ट केलेल्या काचेच्या बाटल्यांचा चुरा व चिरडलेल्या प्लास्टिक बाटल्या जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यात टाकून तो खड्डा पुन्हा बुजविण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाई देसाईगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here