ग्रामीण रुग्णालय कोरची येथे कर्करोग तपासणी शिबिर ; १३२ नागरिकांची तपासणी
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ०८ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष कर्करोग तपासणी मोहिमेअंतर्गत आज ८ जानेवारी २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १३२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचे जिल्हास्तरावर नेतृत्व जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे करीत असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मनिष मेश्राम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा सल्लागार डॉ. प्रेरणा राऊत, डॉ. आशिष विटणकर, ग्रामीण रुग्णालय कोरचीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद मडावी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
ग्रामीण रुग्णालय कोरची येथे कर्करोग तपासणी व्हॅनच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग या महत्त्वाच्या कर्करोगांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुख कर्करोगाच्या ९६ तपासण्या करण्यात आल्या असून संशयित रुग्ण आढळले नाहीत. स्तन कर्करोगाच्या २१ तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्येही कोणताही संशयित रुग्ण आढळला नाही. गर्भाशय मुख कर्करोगासाठी VIA पद्धतीने १५ महिलांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची सखोल तपासणी करून त्यांना आवश्यक ते समुपदेशन देण्यात आले. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे गंभीर आरोग्यदुष्परिणाम, कर्करोगाची प्राथमिक लक्षणे तसेच वेळेवर तपासणी व उपचाराचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले.
या शिबिरात मुख कर्करोग तपासणी डॉ. अश्विनी पारधी यांनी, तर स्तन व गर्भाशय मुख कर्करोगाची VIA व PAP तपासणी डॉ. दिक्षा बोदेले यांनी केली. या कामात ग्रामीण रुग्णालय कोरची येथील परिचारिका सीमा पवार यांनी सहकार्य केले. रुग्णांचे समुपदेशन एनसीडी समुपदेशक रुपेश भैसारे यांनी केले, तर दंत सहाय्यक युवराज आत्राम यांनी तपासणीत सहभाग नोंदविला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालय कोरची येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.













