धक्कादायक : सांभाळ करण्यासाठी दिलेल्या मुलाची केली विक्री, पाच आरोपींना अटक

367

– मध्यस्थी व नोटरी करतांना स्वाक्षरी जाणारे हि अडकले जाळ्यात
The गडविश्व
गोंदिया : पहिल्या पतीपासून झालेला मुलगा दुसऱ्या महिलेला सांभाळ करण्यासाठी देऊन स्वत: दुसरे लग्न करून दोन वर्षांनंतर आपल्या मुलाची विचारपूस करण्यास त्या महिलेकडे गेली असता मुलगा तिच्याजवळ नसल्याचे कळताच गोंदिया शहर पोलिसात धाव घेतली. या प्रकरणात चौकशी केली असता त्या ६ वर्षांच्या मुलाची १ लाख २० हजार रुपयात भंडारा जिल्ह्यात विक्री केल्याची धक्कदायक माहिती पुढे आली.
गोंदिया येथिल एका महिलेला पहिल्या पतीपासून मुलगा झाला असता त्याला सन २०२० मध्ये गोंदियातील मंगला उर्फ मनीषा संतोष चंद्रिकापुरे हिच्याकडे विश्वासाने सांभाळायला दिले होते. व मंगला चंद्रिकापुरे हिने त्या महिलेचे लग्न जळगावच्या चारडी येथील एका इसमाशी लावून दिले. व तुझ्या मुलाचे मी संगोपन करेन, असे तिने तिला म्हटले होते. मंगलावर विश्वास ठेवून दुसरे लग्न करणारी महिला हि मुलाच्या भेटीसाठी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी गोंदियात गेली असता आरोपी मंगलाकडे तिचा मुलगा नव्हता. तिने मुलासंदर्भात विचारपूस असता तिने उत्तर दिले नाही. दरम्यान माझ्या मुलाचे अपरहण झाले असावे किंवा त्याची विक्री झाली असावी असा संशय घेऊन त्या आईने गोंदिया शहर पोलिसात तक्रार केली.
या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी १ मार्च रोजी भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलीस माहिती काढत असतानाच तो मुलगा भंडारा जिल्ह्याच्या आंधळगाव येथे असल्याची माहिती मिळाली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस हवालदार जागेश्वर उईके, पोलीस नायक शिपाई योगेश बिसेन, छगन विठ्ठले, महिला पोलीस शिपाई व डीबी पथकाने त्या मुलाच्या आईला घेऊन आंधळगाव गाठून त्या बालकाला आपल्याजवळ घेतले. आंधळगाव येथील कजोळ छोटेलाल भुरे (४२) व त्याची पत्नी अनिता कजोळ भुरे (३५) यांच्या घरी तो मुलगा आढळून आला. त्या दोघांनी गोंदियाच्या कुंभारेनगरातील मनीषा उर्फ मंगला संतोष चंद्रिकापुरे या महिलेला १ लाख २० हजार रुपये घेऊन तिच्याकडून खरेदी केल्याचे समजले. या प्रकरणी गोंदिया पोलिसांनी कलम ३७०, सहकलम बालहक्क व संरक्षण अधिनियम कलम ७५, ८०, ८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तसेच या प्रकरणी कजोळ छोटीलाल भुरे (४२) व अनिता कजोळ भुरे (३५, दोन्ही रा. आंधळगाव, ता. मोहाडी, जि. भंडारा), मंगला उर्फ मनीषा संतोष चंद्रिकापुरे (३५, रा. कुंभारेनगर, गोंदिया), तसेच या बालकाची खरेदी-विक्री करताना नोटरी करण्यात आली होती. या नोटरीवर सुखदेव केशोराव डोये (४५) याने स्वाक्षरी केली होती तर अनिता अरविंद हटवार (३९, रा. चिचोली) हिने मध्यस्थी करून पैसे घेतले होते व बालकाची विक्री करून दत्तक घेतल्याचे मुद्रांकावर लिहून घेतले. त्यामुळे या प्रकरणात ते सुद्धा अडकले असून या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणातील आणखी आरोपी फरार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here