गोंदिया : भीषण अपघातात चिमुकल्यासह सहा ठार, सात जखमी
– रोजगारासाठी तेलंगणाकडे निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला
The गडविश्व
गोंदिया, दि. ०९ : रोजगाराच्या शोधात तेलंगणाकडे निघालेल्या मजुरांच्या बोलेरोला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने तीन वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. गोंदियापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा गावाजवळ सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की बोलेरो वाहनाचा चक्काचूर झाला.
या अपघातात आरुष मात्रे (३), किरण संतोष वैद्य (२६), संतोष मात्रे (३८), सुशीला मात्रे (३५), रूपसेन सत्यकर (३५) आणि ज्योती रूपसेन सत्यकर (३२) यांचा मृत्यू झाला. तर राजेंद्र पंचाले (३०), भूमेश्वर दुलीचंद मात्रे (३७), संगीता भूमेश्वर मात्रे (३५), संतोष वैद्य (३५), राकेश बाहे (२४), लक्ष्मी पंचाल (२७) आणि संदीप बाहे (३५) हे जखमी झाले आहेत.
सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतांमध्ये भूमेश्वर मात्रे यांच्या पत्नी सुशीला आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आरुष यांचा समावेश आहे. दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लोडामा, पिंपळगाव, सावरी, किन्ही, निमदेवाडा आणि पलेरा या गावातील १३ मजूर रोजगारासाठी तेलंगणातील जगतीहाल आणि करीमनगर येथे जाण्यासाठी सोमवारी रात्री बोलेरोने निघाले होते. नागरा गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या MH 35 AJ 2547 क्रमांकाच्या ट्रकने MP 15 T 3495 क्रमांकाच्या बोलेरोला जोरदार धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी ट्रकचालक मोहसीन खान (३२, रा. गोंदिया) याच्याविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वैभव पवार हे दाखल अधिकारी असून, मसपोनी वर्षा नैताम तपास अधिकारी म्हणून पुढील तपास करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #accident #gondia













