गडचिरोलीत भरदिवसा युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या : जिल्हा मुख्यालय हादरले

251

गडचिरोलीत भरदिवसा युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या : जिल्हा मुख्यालय हादरले
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : शहरातील लांझेडा परिसरात उधारीच्या पैशांच्या वादातून युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१६ मार्च) भरदिवसा घडली. या घटनेमुळे जिल्हा मुख्यालयात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत सचिन कोल्हुरवार (वय ३५, रा. विवेकानंदनगर, गडचिरोली) यांचा मृत्यू झाला. मृतक आणि आरोपी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१९ मध्ये सचिन कोल्हुरवार यांनी आरोपीस फर्निचर बनविण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये दिले होते अशी माहिती आहे. मात्र, आरोपीने ना फर्निचर तयार करून दिले, ना पैसे परत केले. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
दरम्यान, सोमवारी आरोपीने सचिनला लांझेडा वार्डातील आपल्या घराजवळील फर्निचर कामाच्या ठिकाणी पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावले. तेथे दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून तीव्र वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने संतापाच्या भरात धारदार अवजाराने सचिनवर सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सचिन कोल्हुरवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, भरदिवसा युवकाची निर्घृण हत्या झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #crimenews #Gadchiroli #MurderCase #DaylightMurder #CrimeNews #MaharashtraNews #BreakingNews #LawAndOrder #SharpWeaponAttack #CrimeInMaharashtra #GadchiroliNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here