सात बहिणी डोंगरावर अचानक मधमाशांचा हल्ला ; पर्यटक सैरावैरा, पाच जखमी
The गडविश्व
तळोधी. बा. / दि. १६ : तळोधी वनपरिक्षेत्रातील पेरजागड येथील प्रसिद्ध सात बहिणी डोंगरावर रविवारी (१५ मार्च) दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेत चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील पाच पर्यटक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकरपूर येथील शंकर चाचरकर (५५), नथ्थू चाचरकर (६२), सुनिता चाचरकर (५२) व कुटुंबातील अन्य सदस्य लहान मुलाचा नवस फेडण्यासाठी सात बहिणी डोंगरावर आले होते. दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास अचानक मधमाशांचा मोठा थवा पर्यटकांवर तुटून पडला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पर्यटक सैरावैरा पळू लागले. मात्र डोंगरावरील दगडी व खडतर रस्त्यामुळे सुरक्षित स्थळी पोहोचणे कठीण झाल्याने पाच जण मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तसेच ‘स्वाब’ संस्थेचे पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सारंगगड बिटचे वनरक्षक नन्नावरे व गोविंदपूर बिटचे वनरक्षक कागणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, अध्यक्ष यश कायरकर, तसेच जीवन गुरनुले, अमिर करकाडे, गणेश गावतुरे, सुरज नेवारे, नितीन भेंडाळे व गणेश गुरनुले यांनी जखमींना डोंगरावरून सुरक्षित खाली आणले.
जखमींपैकी चार जणांना गोविंदपूर येथील डॉ. मदनकर यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर एका गंभीर जखमी रुग्णाला बेशुद्ध अवस्थेत तळोधी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, सात बहिणी डोंगर परिसरात मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना अधूनमधून घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तरीही येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














