दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक ; दोघांचा मृत्यू, ५१ जखमी
The गडविश्व
सांगली, दि. १४ : सांगली जिल्ह्यातील विटा जवळच्या रेवणसिद्ध घाटात शुक्रवारी दुपारी दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण गंभीर, तर सुमारे ४० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये नंदा हरिदास त्रंबके (वय ६०, रा. खानापूर) आणि धोंडीराम लक्ष्मण पाटील (वय ७८, रा. बांबवडे, जि. सातारा) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी भरलेली एक एसटी बस आणि प्रवाशांनी भरलेली दुसरी एसटी बस विरुद्ध दिशेने जात असताना रेवणसिद्ध घाटात दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की एका बसचा पत्रा फाटून तो दुसऱ्या बसमध्ये घुसला. त्यामुळे अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले.
अचानक झालेल्या या दुर्घटनेनंतर घटनास्थळी प्रवाशांची मोठी धावपळ उडाली. जखमींच्या किंकाळ्या आणि मदतीसाठी सुरू असलेला आक्रोश यामुळे परिसर हादरून गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मदत केली.
दोन्ही बस एकमेकांमध्ये अडकल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. अखेर जेसीबीच्या मदतीने दोन्ही बस बाजूला करण्यात आल्या आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
गंभीर जखमींना तातडीने विटा तसेच कराड, कोल्हापूर आणि सांगली येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवरही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये दुर्घटनेनंतरची परिस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. जखमी प्रवासी मदतीसाठी धावपळ करताना, तर महिला-पुरुष प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अपघाताची भीषणता दाखवणाऱ्या या दृश्यांनी परिसरातील नागरिकांनाही हादरवून सोडले आहे.
या दुर्घटनेमुळे विटा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीसांकडून सुरू आहे.













